technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

अतिरेकी विकासातून होणारा पर्यावरणाचा विनाश: एक वैश्विक समस्या

नीती आयोगाने दोन वर्षांपूर्वी गंभीर इशारा दिला की, बारा वर्षांत भारतात सुमारे ५० कोटी लोकांसाठी पाणी नसेल.  देशाचे व जगाचे वाळवंटीकरण होत आहे म्हणून गेल्या वर्षी दिल्लीत युनोची जागतिक परिषद झाली. वाळवंटीकरण, दुष्काळ व पाण्याची समस्या आपल्या ५५ - ६० वर्षांतील पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच "विकास" नाव आहे. गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट आहे. पण आपणच डोळे मिटले आहेत. 


Image courtesy: depositphotos.com


या स्थितीत जगात औद्योगिकरण तात्काळ थांबवण्याची गरज आहे. त्याऐवजी त्याचा स्फोट केला जात आहे. जणू काही कोरोना, कॅन्सर, अवकाळी, बर्फवृष्टी या दुर्घटना कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावर चालू आहेत. पर्यावरण, जंगल व तापमानवाढीसंबंधी केंद्राचे  मंत्रालय लाॅकडाऊन चालू असताना १९९४ च्या पर्यावरण प्रभाव तपासणी कायद्यात बदल करण्याबाबत जनतेकडून १० मे पर्यंत हरकती व सूचना मागत आहे.


हा कायदा निष्प्रभ करण्यात गुंतलेल्यांना हे जाणवलेले नाही की, औद्योगिकरण थांबले नाही व असेच वागत राहिलात तर पृथ्वीवर निर्माण होत असलेल्या परिस्थितीमुळे येत्या पाच वर्षांत जगातील सर्व सरकारे निष्प्रभ होणार आहेत.


आपण गोष्टी तोडून वेगळ्या पाहतो. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील गतवर्षीच्या महापूरात सुमारे दीड लाख घरांचे नुकसान झाले व १३ हजार किलोमीटर लांबीचे  रस्ते उखडले. केरळमधे पुन्हा अतिवृष्टी व महापूराने विध्वंस केला.


रस्त्यांची दशा पहा. फक्त चालणे शक्य आहे. यात निसर्गाचा संदेश आहे. माणुस हजारो वर्षे कृषियुगात व त्यापूर्वी सुमारे ७० लाख वर्षे पाठीच्या कण्याच्या आधाराने सरळ उभा राहणारा प्राणी म्हणून व त्याही आधी, काही कोटी वर्षे वानरापासुन उत्क्रांत होत असता, पाय व हाताचा उपयोग करून फिरत होता. या सर्व काळात पृथ्वीचे सृजन अव्याहत चालू राहिले होते. जीवनाचा विकास चालू होता.


शंभर दीडशे वर्षांचा एवढा छोटा काळ, जेव्हा त्याने स्वयंचलित वाहने वापरली आणि आता पुन्हा शंभर दीडशे वर्षांपूर्वीचा काळ आला, चालत जाण्याचा. स्वयंचलित यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी खनिज इंधन लाकुड, कोळसा, तेल, वायू जाळले (अणुऊर्जेसाठीही) . मोटारींसाठी सीमेंटचे रस्ते बांधले. फरक हा आहे की,  या यांत्रिक वाहनांच्या व रस्त्यांच्या आधी करोडो वर्षे सृष्टी अस्तित्वात होती, आता एवढ्या अल्प काळात ती नष्ट होत गेली. आता तर डोंगर फाटत आहेत.


वास्तुविशारद, अभियंत्यांना व उद्योगपतींना गर्व झाला आहे की, ते काहीही निर्माण करू शकतात वा बदलू शकतात. आपण जणू पृथ्वीवर नाहीत व पृथ्वीचे कायदे व नियम आपणास लागू नाहीत या भ्रमात शहरे आहेत.


परंतु सत्य हे आहे की, ते पृथ्वीच्या शिल्पशास्त्र व अभियांत्रिकीपुढे क्षुद्र आहेत. पृथ्वीच्या निर्मितीत सृजन होते, जीवनाचा विकास होता. आता जीवनाचा अंत होत आहे. पृथ्वीने जीवनाचा आधार असलेल्या नद्या वाहवल्या, फुलवल्या, मात्र अभियंत्यांनी नद्या अडवल्या, रोडावल्या, शुष्क केल्या.


"Assemblage of material intended to sustain load" . ही वास्तुकलेची व्याख्याच घ्या. या निकषावर पृथ्वीवरील कुठलाही बांबू, माड, वृक्ष व इतर झाड, यांच्यापुढे जगातील कोणताही आर्किटेक्ट असो वा अभियंता, मग तो 'ल कार्बुझिए' असूदे नाहीतर 'चार्ल्स कोरिया', यांची बांधकामे काही नाहीत.


माती व जिवाणू, गांडुळांच्या किमयेसमोर सीमेंट व खतांचे कारखाने ही व्यर्थ उपद्व्यापी उठाठेव आहे. एका मानवी शरीरात, निसर्गतः उत्क्रांत झालेल्या, डोळ्यांना न दिसणार्‍या, ३०० ते ४०० कोटी, एवढ्या प्रचंड संख्येने असलेल्या अतिसूक्ष्म पेशीतील घटक व कार्यपद्धती यांचा शोध मानवी प्रयोगशाळांना अजूनही घेता येत नाही. या पेशींपुढे मोटार वा अंतराळयान काही नाही. हे मी भावनेच्या भरात नव्हे, तर पूर्ण विज्ञानाच्या व वास्तवाच्या आधारे लिहित आहे.


जगभर डोंगर खचत आहेत. याचे कारण, रस्ते व बांधकामासाठी दगड, लाद्या, ग्रॅनाईट, मार्बल, लाकुड इ., सीमेंट निर्मितीसाठी चुनखडी,  मोटार व इतर वस्तुनिर्मितीसाठी लोखंड, तांबे, ऍल्युमिनियम इ. धातूंसाठी खाण करून झालेली डोंगर व जंगलाची तोड आहे.


गाडगीळांसारखे तज्ञ सांगतात की, अवैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडले, अनधिकृत बांधकामे केली म्हणून महापूर आले. यामुळे असा गैरसमज पसरतो की,  "वैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडता येतात व बांधकाम अधिकृत हवे मग पूर येत नाही". औद्योगिकरण व शहरीकरण चालवण्यासाठी पृथ्वीचे लचके तोडणाऱ्या या गोष्टी केल्या जात आहेत , ती कृति वैज्ञानिक व अधिकृत असणे म्हणजे काय? त्यामुळे दुर्घटना कशी टाळणार ?


खरेतर, या महापूराला, अनेक डोंगर व जंगलांचे अस्तित्व मिटवले जाणे हे कारण आहे. ते वैज्ञानिक की अवैज्ञानिक, कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्न नाही. डोंगर व जंगल तर आता दिसत नाही. पण त्यांच्या न दिसण्यानेच, बुडवणारा महापूर आला. मग डोंगर गेले तेव्हा व आताही ते जात असता आपण गप्प का? कारण ते आपल्याच वागण्यामुळे, जीवनशैलीमुळे जात आहेत. म्हणून आपण बोलू इच्छित नाही. पण हे वागणे योग्य नाही.


ते डोंगर मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत, सह्याद्रीचे  आहेत, हिमालयाचे आहेत. त्यांच्या नष्ट होण्यासाठी औद्योगिकरण कारण आहे. त्यातील कार्बनच्या उत्सर्जनामुळे ढगफुटी व अतिवृष्टी होत आहे.


कार्बनने उष्णता शोषून धरल्याने ध्रुवांवरील व पर्वतांवरील बर्फाची व महासागरातील पाण्याची अभूतपूर्व गतीने वाफ होत आहे. हे डोंगर व जंगल पावसाचे पाणी शोषून धरत होते. ते तोडून आपल्या शहरात, घरात आणले, म्हणून त्यांनी शोषावयाचे पाणीही महापूराच्या रूपाने घरात आले. त्यांना जसे होते तसे त्यांच्या जागी राहू देणे आपल्या हिताचे होते. आपल्या दृष्टीने अविकसित असलेल्या आमच्या शहाण्या पूर्वजांना हे कळत होते. आता धरणे, त्यांचा विसर्ग ही चिंतेची बाब झाली आहे.


माणसांनी समजून घ्यायला हवे की, हे तंत्रज्ञ काही शाश्वत, उपयुक्त घडवत नसतात. उलट पृथ्वीची अदभूत जीवनदायी रचना बिघडवत असतात. ज्यामुळे मानवजात घडली, ज्या हवा-प्राणवायू, पाणी व अन्नामुळे ती जगते, अस्तित्वात आहे, ते निर्माण करणारी पृथ्वी, तिच्यावरील नद्या, सागर, डोंगर, जंगल, माती, वातावरण, तापमान हे तंत्रज्ञान व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत आहे.


शंभर वर्षांपूर्वी झालेला या देशाचा स्वातंत्र्यलढा, हा  मुख्यत्वे शेतकर्‍यांचा लढा होता. पण तेव्हा कुणी शेतकरी मागणी करत होते का? की, आम्हाला रासायनिक खते द्या, कीटकनाशके द्या, संकरित- कृत्रिम बियाणी द्या, वीज द्या, पाणी द्या, ट्रॅक्टर द्या, कर्ज द्या. ते फक्त म्हणत होते की,


"आमचे शोषण करणार्‍या ब्रिटिशांनो चालते व्हा" . "आम्ही हजारो वर्षे काळ्या आईबरोबर जगलो तसे जगू द्या". त्यांनी बियाणी व पाण्याला पवित्र मानले. त्यांची कधी विक्री केली नाही. खत, वीज व ट्रॅक्टरची त्यांना गरज नव्हती.


आम्ही ब्रिटीशांना घालवले परंतु त्यांची राजवट घेतली आणि भारतीयत्व गमावले.


नेहमी महापूर येतात, म्हणून उंचावर घरे बांधणे, अधिक मजबूत असतात या गैरसमजातून सीमेंटची बांधकामे करणे, हे काहींना  उपाय वाटत आहेत. मग  गावे हलवणार का? शेती कुठे करणार? आणि खचणार्‍या डोंगरांचे, कोसळणाऱ्या कड्यांचे, जमिनीला पडणाऱ्या भेगांचे काय ?


सीमेंट उद्योग व बांधकामांतून उखळ पांढरे करणारांना ही पर्वणी वाटू शकते.


कोकणातून पश्चिम समुद्रात वाहून जाणारे पाणी, सह्याद्रीत बोगदा खणून मराठवाड्यात व उत्तर महाराष्ट्रात, आणि वैनगंगेचे पाणी ४८० किलोमीटरचा बोगदा खणून पूर्व व पश्चिम विदर्भात आणले तर तो भाग दुष्काळमुक्त होईल असा मागच्या सरकारचा विचार होता.


याबाबत काही भयंकर स्वरूपाचे गैरसमज  तात्काळ दूर होणे आवश्यक आहे. कोकणातूनच नव्हे तर सर्वच नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी वाया जाते, असा समज तंत्रज्ञानाचा प्रभाव व पृथ्वीबाबत अज्ञान असलेल्या शिक्षणामुळे सर्वत्र पसरला आहे.


नद्यांचे पाणी सागरात करोडो वर्षे जात आहे, आणि ते तसेच जाणे हे सागरातील व पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सागराची ३५ ही क्षारता म्हणजे, एक हजार भाग पाण्यात ३५ भाग मीठ, ही विशिष्ट स्थिती त्या नद्यांमुळे टिकून आहे. जसजसे धरणे बांधून नद्या अडवल्या जात आहेत, तसतसे सागराची वाफ होत राहुन, उर्ध्वपतन झालेले नदीतून येणारे पावसाचे गोडे पाणी न मिळाल्याने सागराची क्षारता वाढत जाते व त्या प्रमाणात मासळी व इतर जीवसृष्टी घटत जाते.



Image courtesy: depositphotos.com


४० ते ४२ भाग मीठ झाल्यास सागर मृत होतो. ही गोष्ट एवढी नाजूक आहे.  नगदी पिकांच्या हव्यासाने, रशियातील 'अरल' समुद्रात जाणाऱ्या 'अमूदर्या' व 'सिरदर्या' या नद्या धरणे बांधून अडवल्या. त्यामुळे 'अरल' सागराचे मिठागरात रूपांतर झाले व वाऱ्याबरोबर मिठाचे कण पसरून शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत शेती, पिके नष्ट झाली. जमीन नापिक झाली. दुष्काळ पडून लोक  बेदखल झाले.


 मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचा सागर आधीच औद्योगिकरणामुळे मृत झाला आहे. उरलाय कोकण. भौतिक विकासामुळे तेथेही मासळी आधीच कमी झाली आहे. कोकणातही दुष्काळ सुरू झाला आहे.


कोयनेचा विसर्ग थांबवणे वा धरणे करण्याने, पृथ्वीच्या दृष्टीने एका छोट्या पण वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घडणीचे वरदान लाभलेल्या कोकणच्या सागरात पूर्ण मासळी दुष्काळ होईल, याचा परिणाम म्हणून कोकणातही शिरलेला दुष्काळ मोठे रूप घेईल.


धक्कादायक गोष्ट ही आहे की, सत्य प्रचलित समजाच्या नेमके उलट आहे. समज असा आहे की, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण - शहरीकरण झालेले व तंत्रज्ञानाचा मोठा वापर करणारे महाराष्ट्र राज्य सर्वात प्रगत व समृद्ध आहे. पण सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रात आहेत व सर्वात कमी सिंचन येथेच आहे. मराठवाड्याचे उदाहरण घ्या. १९७३ सालात अधिकृत आकडेवारीप्रमाणे १७ तालुके दुष्काळग्रस्त होते. १९८७ सालात २६ तालुके दुष्काळग्रस्त झाले. २०१८ सालात ही संख्या ४८ झाली. यात आधीपासुनचे तालुके कायम राहिले. याच काळात मराठवाड्यात व महाराष्ट्रात धरणे वाढत होती. मग दुष्काळ का वाढला? तो या तथाकथित विकास व प्रगतीमुळेच वाढला.


औद्योगिकरण म्हणजे प्रगती मानले की, औद्योगिक व शहरी रोजगार हे उद्दिष्ट बनते. उद्योग, बांधकाम, वीजनिर्मिती, वाहननिर्मिती, वाहन चालवणे, रासायनिक शेतीमुळे खत कीटकनाशके इ. रसायननिर्मिती, यात रोजगार, नोकऱ्या मिळत गेल्या. या रोजगाराला प्रतिष्ठा. हीच बाजारपेठ. तिला धान्य पुरवण्यासाठी शेती. त्यातून आलेल्या पैशातून त्याच औद्योगिकरणातून बनलेल्या वस्तु तो विकत घेणार. हजारो वर्षे कुठल्याही प्राण्याप्रमाणे स्वतःच्या भुकेसाठी अन्न पिकवण्यासाठी ही शेती नाही.


कारखाने माणसांना जगवतात हा गैरसमज व आता पाणी नाही म्हणून हे जगवणारे कारखाने, बांधकामे इ. बंद ठेवावे लागतात म्हणून खंत. यांच्या दृष्टीने पाऊस, निसर्ग व नदी हे खलनायक. सत्य हे की, वर उल्लेखलेले कारखाने, बांधकामे इ. मुळेच  पाणी नाही.  औद्योगिकरण शहरीकरणामुळे नदी कोरडी झाली. नदीला दोष का देता?


पाणी जीवनाचा आधार व पाणी असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह. पृथ्वीवर कोट्यावधी वर्षे, पाणी तेथे जीवन होते.


मात्र आज अल्प काळात, औद्योगिक युगात, "जेथे आम्ही तेथे पाणी हवे (शहरीकरण) व  जे आम्ही करू त्यासाठी (औद्योगिकरण) पाणी ही पृथ्वीविरोधी भूमिका आली". याला आधुनिक, 'जलव्यवस्थापन' म्हणतात.


स्पष्ट आहे की, हे 'जलविध्वंसन' आहे. धरणे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी, पूर नियंत्रणासाठी बांधली गेलीच नाहीत. ती औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्था चालवण्यासाठी बांधली गेली.


हे अधिक स्पष्ट करू. डहाणूच्या खाडीतील औष्णिक म्हणजे कोळसा जाळून वीजनिर्मिती केंद्र तासाला ६६००० घनमीटर पाणी, यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वापरते. त्यात गरम झालेले पाणी नदी, खाडी, सागरात परत सोडल्याने जीवसृष्टीचा नाश झाला. असे सुमारे ६०००० कोटी लीटर पाणी देशात रोज औष्णिक वीजनिर्मितीसाठी लागते. यंत्रणा धुण्यासाठी अजून लाखो लीटर पाणी लागते.


अशीच गोष्ट सीमेंटबाबत आहे. एक टन सीमेंट काँक्रिट बनवण्यासाठी २००० टन पाणी लागते. साखर हा नैसर्गिक पदार्थ वाटतो. पण एक किलो साखरेसाठी २५०० किलो पाणी लागते. उत्पादित साखरेपैकी सुमारे ७५ % साखर चाॅकलेट, शीतपेये व आईसक्रीमसाठी ( हे पूर्वी कधी अन्न नव्हते ) म्हणजे औद्योगिक व शहरी जीवनशैलीसाठी वापरली जाते.


मद्यासाठी साखर व पाणी जाते. दुष्काळी भागात पिण्याला पाणी नाही तरीही मद्यनिर्मिती कारखाने मोठा पाणीवापर करत आहेत. एक लहान आकाराची मोटार बनवताना १५५००० लीटर पाणी वापरले जाते. ती वापरताना धुण्यासाठी व देखभालीसाठी लागते ते पाणी वेगळे.


या पध्दतीने आपल्या आसपास, विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीप्रमाणे पसरलेले कृत्रिम पदार्थ व वस्तुंचे जग, फक्त जीवनासाठी असलेल्या पाण्याचा, पृथ्वीच्या इतर घटकांचा व क्षमतांचा कल्पनातीत, जीवनविरोधी गैरवापर करत आहे. पृथ्वी बनवत नाही व जी आपली गरज नाही अशा पदार्थ व वस्तुंसाठी पैसा लागू लागला. हवा, पाणी व अन्नासाठी कधीही पैसा लागत नव्हता.


माती व बांबूच्या घरासाठीही पैसा लागत नव्हता. वस्त्रासाठीही पैसा लागत नव्हता. आज चालले आहे ते सर्व काही, रोजगार व  नोकरी आपणास जगवते या भ्रामक कल्पनेमुळे केले जाते. आपल्याला हवा, पाणी व अन्नाद्वारे पृथ्वी जगवते. पृथ्वी सरळ जीवन देण्यासाठी आहे, रोजगार- नोकरी देण्यासाठी नाही. फक्त काही पिढ्यांच्या रोजगारासाठी मानवजात नष्ट होत आहे.


६० वर्षांपूर्वीपर्यंत भारतभूमी " सुजलाम सुफलाम " होती. वंदे मातरम गीतात तोच उल्लेख आहे. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. विहिरी, तळी भरलेली होती. भूजल भूपृष्ठालगत होते. ही स्थिती करोडो वर्षे होती. स्वातंत्र मिळाले तेव्हा साडेसात लाख खेड्यांच्या या देशात, फक्त सुमारे २५० गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते.


राजस्थानातील जैसलमेर, जोधपूर, बिकानेर या १०० मिमी. जेमतेम पाऊस पडणाऱ्या वाळवंटी भागातील गावेही पाण्याबाबत स्वयंपूर्ण होती. यात भारतीयांची बुध्दिमत्ता, कल्पकता, शहाणपण, प्रतिभा होती व त्याला संयम, साधेपणाची व पृथ्वीसुसंगत जीवनपध्दतीची जोड होती. 


औद्योगिकरणानंतर आज देशात सुमारे  तीन लाख गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, महाराष्ट्रात ३२००० गावांत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य व दुष्काळ आहे.


पंतप्रधान गतवर्षी १५ ऑगस्टच्या भाषणात म्हणाले की, "देशातील निम्म्या घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. महिलांना कित्येक मैलांची पायपीट करून पाणी मिळवावे लागते". ते म्हणाले की, "प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजनेत साडेतीन लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे."


खरी गोष्ट ही आहे की, कुणाला तरी थोड्यांना  नळाचे पाणी मिळाले म्हणून इतर बहुतेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या थोड्यांचेही पाणी कधीनाकधी जाणार असते. धरणे बांधून नळाने पाणी आले म्हणून गावकऱ्यांनी  आपले खरे आधार असलेल्या गावातील तलाव व विहिरींकडे, आता यांची गरज नाही, यांना नीट कशाला  ठेवायचे, म्हणून दुर्लक्ष सुरू केले.


पैसा कमावण्यासाठी बारमाही पिके घेता यावी म्हणून बोअरवेलने अधिकाधिक पाणी उपसा सुरू झाला. आता स्थिती अशी आहे की, अनेक भागांत नळाने आठ- पंधरा दिवस किंवा महिन्याने पाणी येते व बोअरवेलमुळे भूजल पातळी शेकडो फूट खोल गेली आहे.


नद्यांना धरणांनी अडवल्याने त्या आटल्या. विहिरी व तळी कोरडय़ा आहेत, गाळाने भरली आहेत. त्याचवेळी  सरकारनेही आदर्श ठरवलेल्या, नव्या शहरात दिसणाऱ्या जीवनशैली साठी पैसे हवे म्हणून किंवा नगदी पिकांच्या लागवडीसाठी झाडे व जंगल तोडून विकणे चालू राहिले. त्यामुळे भूजल खालावत राहिले.


उष्णता वाढत राहिली. साठ वर्षांत सरकारांनी पाश्चात्यांचे अनुकरण करून जीडीपी ची वाढ हे उद्दिष्ट ठेवले. औद्योगिकरण व अर्थव्यवस्था खनिजांची,  ऊर्जास्त्रोतांची व नैसर्गिक संसाधनांची सतत मागणी करणार. यात पाणी साठवणारे नद्यांना वाहते ठेवणारे डोंगर सतत तोडले जात राहणार. पाणी उपलब्धता व जीडीपीची वाढ एकत्र जाऊ शकणार नाही. ही अर्थव्यवस्था पृथ्वीवर शाश्वत असू शकत नाही.


धरणे कधीही गरजेची नव्हती. साधा विचार मनात यायला हवा की, जर ६० वर्षांपूर्वीच्या  कृषियुगात सुमारे दहा हजार वर्षे व त्यापूर्वी कोट्यावधी वर्षे हत्ती, गेंडे आणि हिप्पोपोटॅमससारखे  प्राणी आणि व्हेलसारखे महाकाय मासे कोट्यावधींच्या संख्येने सुखाने जगले, एवढे पाणी व अन्न होते तर त्यांच्या तुलनेत टिचभर पोटाचा माणुस जगू शकत नाही व त्याच्यासाठी नद्यांना धरणे बांधून अडवावे लागले हे पटण्यासारखे आहे काय? पण शिक्षितांनाही हे पटते व धरणांची बाजू घेऊन ते भांडतात याचे आश्चर्य वाटते. ही भ्रमिष्टपणाची हद्द झाली. 


आपल्याला काही कष्ट न करता जीवसृष्टीचे व गावांचे हिरावलेले पाणी नळाने सतत मिळते, अशा व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी सत्य लपवले जात असावे. गेल्या ६० वर्षांपूर्वी जर पाणी समस्या नव्हती तर ६० वर्षांत जे केले ते चुकले हे मान्य करावे व ते रद्द करावे.


धरणे उखडून काढून टाकण्याची गरज आहे. त्यापेक्षा भयंकर चूक म्हणजे नद्या जोडणे. असे आहे का की, कुणी नद्या तोडल्या म्हणून पाणी समस्या निर्माण झाली व म्हणून त्या पुन्हा जोडायच्या. तसे तर नाही. नद्या जशा लाखो, करोडो वर्षे होत्या त्या स्थितीत भारत सुजलाम सुफलाम होता. मग नद्या का जोडायच्या?


ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली ती प्रक्रिया उलट फिरवा. धरणे काढा. यंत्रयुग थांबवून कृषियुगात जा.


कृषियुगात पाणी, पिके, मातीतील घटक  जमीनीचा उंच सखलपणा, खनिजे, जिवाणू, गांडुळे, गायी - गुरे, माणुस, कीटक, झाडे, जंगल, डोंगर व इतर जैविक विविधता, आर्द्रता, तापमान इ. सर्व घटकांचा समन्वय होता. ती ती पिके, कंदमुळे, भाजीपाला इ. वर्षभर, हजारो वर्षे होती. याला नदी, तलाव व सागरातून मिळणाऱ्या अन्नाची साथ होती. हे सर्व गमावून भात, गहू, ऊस, कापुस, सोयाबीन, केळी, अननस, इ. नगदी एकल पिके घेण्याची चूक केली गेली.


गेली सहा वर्षे अनेक भागांत व गावांत सलग दुष्काळ व अवर्षण आहे आणि या दुष्काळी क्षेत्राचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रात गतवर्षीपर्यंत ४६% वाळवंटीकरण झाले आहे. दर एकरी उत्पादन जगात व भारतातही दरवर्षी घटत आहे.


माजी मुख्यमंत्र्यांनी, सांगली कोल्हापूरची अतिवृष्टी व महापूरास 'वातावरण बदल' कारण आहे असे म्हटले. पण याचे खरे स्वरूप त्यांना कळलेले दिसत नव्हते. नाहीतर त्यांनी 'सह्याद्रीत बोगदा करणे' वा वैनगंगा नदी वळवण्यासारखे प्रचंड बांधकामे असलेले ऊर्जाग्राही उपाय सुचवले नसते व समृद्धी काॅरिडाॅर, मेट्रो इ. प्रकल्प रेटले नसते.


देशातील सर्व कुटुंबांना, धरणे बांधून नळाचे पाणी पुरवणे, वीज पुरवणे व सीमेंटची घरे देणे, मोटार- बाईक इ. वाहने वापरणे हा विकास मानला तर उरलेले पाणी येत्या दहा वर्षांत गमावलेले असेल व फक्त तीन दशकांत भारत व जग निर्मनुष्य आणि निर्जीव बनेल.


डोरेमाॅनच्या गॅजेटप्रमाणे सरकारे आपल्या पोतडीतून एकामागे एक योजना बाहेर काढतात. चिंतेची बाब ही आहे की, पदवीधरच नव्हे तर पीएचडीधारकांचेही पृथ्वीबाबतचे आकलन कार्टून पहाणार्‍या बालकांच्या वयाचे आहे.


वर उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या सहा वर्षांत अवर्षण, पाणी दुर्भिक्ष्य, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, वणवे, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर इ. दुर्घटना का वाढत आहेत? याबाबत सरकार व जनता दोघेही गाफील आहेत. आताच जुलै महिन्यात मुंबई व पृथ्वीबाबत आतापर्यंतचे विक्रमी तापमान नोंदले गेले. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या देशात जनतेच्या खिजगणतीत नाही व इतर सर्व बिनमहत्त्वाच्या व फाजिल गोष्टींत ती रस घेते.


सहा वर्षांपूर्वी १२ मे २०१३ रोजी पॅसिफिक महासागरावर व मे २०१५ मधे पृथ्वीच्या वातावरणात सर्वत्र कार्बन डाय ऑक्साईड ह्या उष्णता शोषून धरणाऱ्या प्रमुख वायूने ४०० पीपीएम ही अतिधोकादायक पातळी ओलांडली.


२८ मे २०१३ रोजी अमेरिकेत 'ओक्लाहोमा' शहर ताशी ३२० किलोमीटर या विक्रमी वेगाच्या टोर्नाडोने उध्वस्त केले. १५ जून २०१३ रोजी उत्तराखंडात दोन हिमनद्या कोसळून केदारनाथची दुर्घटना घडली. वाढत्या तापमानामुळे जगात तेव्हापासून  जवळजवळ दररोज  सातत्याने वाढत्या तीव्रतेने व वारंवारतेने भीषण दुर्घटना घडत आहेत.


सांगली - कोल्हापूरचा महापूर त्याचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी बहामा बेटांना उध्वस्त करून अमेरिकेत दहशत निर्माण करणारे 'डोरियन' हे ताशी ३२५ किमी. या, त्या प्रदेशातील विक्रमी वेगाचे ५ श्रेणीचे चक्रीवादळ हे त्याचे उदाहरण आहे.


याला कारण औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था आहे. 'कार्बन डाय ऑक्साईड' या एकाच वायूच्या, पृथ्वीवरील सन २०१८ च्या ३८०० कोटी टन उत्सर्जनात वाहनांचा वाटा सुमारे १५५० कोटी टन, कोळसा जाळून वीजनिर्मितीचा सुमारे १४५० कोटी टन, व सीमेंटचा सुमारे ३७५ कोटी टन आहे ( एकूण ९४%). याशिवाय टीव्ही, वाॅशिंग मशिन, एसी, फ्रीज इ. हजारो वस्तुनिर्मितीत  होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा  सहा टक्के आहे.


वैज्ञानिक संस्था, उष्णता शोषणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अर्थव्यवस्थेची प्रगती व विकास कल्पनेची नशा एवढी जबरदस्त आहे की ते ऐकले जात नाही. परंतु आता हे उत्सर्जन कमी करूनही भागणार नाही, कारण ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील 'बाॅन' येथे झालेल्या, युनोच्या महत्त्वाच्या परिषदेत जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक डाॅ. पेट्टेरी टलास यांनी जाहीर केले की, "तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे".


कार्बनने अशी मर्यादा ओलांडली आहे की, पृथ्वीचे तापमान सतत वाढत राहणार आहे. याचा अर्थ आता, कार्बनचे  उत्सर्जन या क्षणी थांबले पाहिजे व त्याला शोषणारे हरितद्रव्य वाढत गेले पाहिजे. हे तरच शक्य आहे जर वीजनिर्मिती, उद्योग, वाहतूक, बांधकाम, रासायनिक- यांत्रिक शेती थांबवली जाईल.


म्हटले तर हे खूप कठीण आहे व म्हटले तर सोपे आहे. ज्या पध्दतीने औद्योगिक शहरात माणुस वाढतो त्यामुळे ते कठीण वाटते पण आजही कृषियुगाप्रमाणे व जंगलात, काही कोटी माणसे जगतात व फक्त साठ वर्षांपूर्वी आपल्या देशात आणि शंभर- दोनशे वर्षांपूर्वी युरोप अमेरिकेत बहुतांश माणसे स्वयंचलित यंत्र, वीज, सीमेंट, टीव्ही, मोबाईल, फ्रीज इ....  शिवाय जगत होती.


२५० वर्षांपूर्वी तर सर्वच तसे जगत होते. मानवजात व जीवसृष्टीचे, आपल्या मुलाबाळांचे,  पृथ्वीवरून उच्चाटन करून घेण्यापेक्षा हवा, पाणी, अन्न या खऱ्या गरजा व वस्त्र, निवारा, वाहतूक इ. वाढवलेल्या गरजा कृषियुगाप्रमाणे भागवून जगण्यास कोणताही शहाणा माणूस तयार होईल. रोजगार आणि जीडीपीची वाढ असल्या निरर्थक गोष्टींपेक्षा प्राणवायू, पाणी, अन्न व अस्तित्व देणाऱ्या पृथ्वीशी सरळ जोडून घेण्यात कमीपणा का वाटावा?


 'वातावरण बदल, व त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी ०.२०° सेल्सिअस म्हणजे पाच वर्षांत १° सेल्सियस, या धक्कादायक अभूतपूर्व भयंकर गतीने होणारी,  मानवजात व जीवसृष्टी फक्त सुमारे तीस वर्षांत नष्ट करणारी, पृथ्वीच्या सरासरी तापमानातील वाढ लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेन, समृद्धी काॅरिडाॅर, गोवा - मुंबई महामार्ग, रिफायनरी, बंदरे, विमानतळ, सागरी रस्ता,  मेट्रोंसह महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प रद्द करावे.


तसे केले नाही तर येत्या चार ते पाच वर्षांत नागपूर, मराठवाड्यासह विदर्भातील काही भाग उष्णतेच्या लाटेत निर्मनुष्य होणार आहे हे राजकारणाच्या धुंदीत असलेल्या सर्व पक्षांच्या सर्व पातळीवरील नेत्यांनी लक्षात घ्यावे. जनतेनेही औद्योगिक जीवनशैली सोडणे आपल्या हातात आहे याची जाणीव ठेवावी. राजकारण्यांना दोष देणे, जबाबदार धरणे वा अपेक्षाही ठेवणे बंद करावे.


ही पृथ्वीवरील आणिबाणी आहे. तुम्ही  आपल्या जीवनशैलीसाठी यापुढे पृथ्वीला वाकवू नये. पृथ्वीची सहनशक्ती संपली आहे. पृथ्वीला सर्व प्राणिमात्रांचे जीवन मान्य आहे पण तुम्हा स्वतःला आधुनिक म्हणवणाऱ्या मानवाची जगण्याची शैली मान्य नाही. यात तुमच्यासह हकनाक, निसर्गाधारित जगणाऱ्यांचा व इतर निरपराध जीवसृष्टीचा विनाश होणार आहे.


शेकडो फूट उंच बांधकामे करणाऱ्या माया, इंका, रोम, कॅरिबिअन व इजिप्शियन संस्कृती नामशेष झाल्या. त्यांनी केलेल्या शहरीकरणासाठी, नगदी पिकांसाठी त्या बारमाही सिंचनाच्या सापळ्यात अडकल्या. बारमाही सिंचनाच्या प्रयत्नात नद्या बारमाही वाहणे बंद झाले.


वाळवंटीकरणाने तीन चारशे ते हजार बाराशे वर्षांत या संस्कृती नष्ट झाल्या. आता  २५० वर्षांत, यंत्र, हजारो वस्तुंची निर्मिती व सीमेंट, स्टील, प्लास्टिकसारखे रासायनिक पदार्थ व, उष्णता शोषून तापमान वाढवणाऱ्या वायूंचे उत्सर्जन, यामुळे अतिशय जलद गतीने व पृथ्वीच्या परिमाणात हे नामशेष होणे घडत आहे.


आधी काही वर्षे उत्पादनखर्चामुळे शेती परवडत नव्हती व गेल्या सहा वर्षांपासून वातावरण बदल व त्यामुळे झालेल्या तापमानवाढीमुळे अवकाळी, अवर्षण, घटते भूजल, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर, वादळे इ. मुळे शेती होत नाही. म्हणून शेतकरी मरतो हे दिसते. पण शहरे, जेथे पिकते तेथून अन्न खेचून घेतात व जग छान चालू आहे असा आभास तयार होतो. प्रत्यक्षात पूर्ण मानवजात व जीवसृष्टी नष्ट होत आहे.


भारताची संस्कृती हजारो वर्षे टिकली असे आपण म्हणतो तेव्हा ते कल्पक शेतकऱ्यांचे कर्तृत्व असते. त्याचे श्रेय त्यांच्या संयम व साधेपणावर आधारित पृथ्वीसुसंगत जीवनपद्धतीकडे जाते.


बव्हंशी भारतीय समाजच शेतीपध्दतीत राहिला. जंगलातील जीवन सोडले तरी मासेमारी, आदिवासी जीवनाशी त्यांचा जिवंत संबंध राहिला. या हजारो वर्षांत शहरांचे प्रस्थ माजले नाही. त्यांना अवाजवी प्रतिष्ठा नव्हती. भारतीयांनी अगदी राजस्थानातही, पावसाळ्याच्या आधारावर, निसर्गाच्या विरूद्ध न जाता  वर्षभर जगवणारी शेती हजारो वर्षे केली. तेव्हा कुणी कोरडवाहू म्हणून हेटाळणी केली नाही आणि सिंचन हवे म्हणून बोंबाबोंब केली नाही. शेतकरी कुणावर अवलंबून  नव्हता. बदल हा नेहमीच चांगल्यासाठी नसतो. जे २५० वर्षांत पाश्चात्य जगात व ६० वर्षांत भारतात बदलले त्याचे भीषण परिणाम समोर दिसत आहेत.


जेथे निसर्गाने, तेथील अनेक गुणधर्मांना, पावसाच्या प्रमाणाला व पृथ्वीच्या जडणघडणीला अनुसरून ज्वारी व बाजरी हे गवत वाढवले तेथे तेच असणे शाश्वत हिताचे होते. तेथे तंत्रज्ञान वापरून 'आर्थिक' नामक अशाश्वत कृत्रिम व्यवस्थेसाठी नद्या अडवून धरणे इ. करून ऊस वा भात नावाचे विसंगत गवत, अनिष्ट हस्तक्षेप करून लावणे हे नुसते अयशस्वी नव्हे तर विध्वंसक ठरणारच. हे समजणे हे विज्ञान आहे. पृथ्वी भुकेसाठी अन्न देते. बाजारासाठी धान्य नाही. कारण तिला औद्योगिकरण व शहरीकरण अभिप्रेत नाही.


वीज कशी बनते हे खऱ्या अर्थाने, पृथ्वीच्या दृष्टिकोनातून शिक्षणात आले नाही. कारण शिक्षण औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्थेसाठी बनवले गेले. ब्रूनो, कोपर्निकस, गॅलिलिओ ते आईनस्टाईन हा विज्ञानाचा प्रवाह. तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान. जेम्स वॅट, एडिसन पासुन वाफेचे इंजिन, वीजेचा दिवा, सीमेंट, टीव्ही, वाॅशिंग मशिन, फ्रीज, काँप्युटर, मोबाईल इ. हा तंत्रज्ञानाचा प्रवास.


विज्ञान हे लालसा असणारांकडून वापरले जाऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचे तसे नाही. ते वापरले जाऊ शकते. म्हणून ते नव्या स्वरूपाच्या व्यापारी सत्तेच्या ताब्यात गेले व विज्ञानाच्या प्रवाहाचा पराभव झाला, असे चित्र तापमानवाढीकडे ज्या पध्दतीने दुर्लक्ष केले जाते त्यातून दिसते. परंतु वरच्या मूलभूत पातळीवर असलेले विज्ञान, हा सत्याचा शोध आहे आणि सत्य पराभूत होऊ शकत नाही. ते आपणास वाळवंटीकरणाच्या रूपाने भिडत आहे.


शिक्षणाने वाढीच्या काळात १५-२० वर्षे मनावर  औद्योगिकरणाचे उदात्तीकरण बिंबवले जाते.  कधी जीवनशैलीच्या संमोहनातुन तर कधी अगतिक बनवुन, बांडगूळासारखी शहरी कृत्रिम व्यवस्था व त्यातील नोकरी माणसांना जगवते हा गैरसमज रूजवला गेला.


आपण पृथ्वीवरील जीवनाचा मूळ आधार असलेल्या मुबलक पाण्याचा आनंद शेतीतील हजारो वर्षे व जंगलातील लाखो करोडो वर्षे घेतला होता. काय समजायचे व करायचे ते तुम्हीच ठरवा. पृथ्वी, निसर्ग, अस्तित्व व सत्याच्या  बाजूने उभे रहा व स्वतःशी लढा. 


पृथ्वीरक्षण चळवळीत सामील होण्यासाठी संपर्क:


ऍड. गिरीश राऊत

निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
मोबाईल: ९८६९०२३१२७


Tags: climate change, climate change of india, climate change define, climate change in india, climate change definition, climate change performance index, climate change quotes, climate change quotes in Marathi,  climate change definition in marathi,


Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]