जाणून घ्या आषाढी वारी पालखी सोहळ्याबद्दल संपूर्ण माहिती
सध्या कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. ही परिस्थितीही विचारात घेवून आषाढी वारी पालखी सोहळा योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह पार पाडला जावा, अशीच प्रत्येकाची भावना आहे.
परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता शासकीय नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी काढू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आषाढी वारी सोहळ्याच्या आयोजनाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सदस्य सचिव विठ्ठल जोशी, श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे राजाभाऊ चोपदार, ॲड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, श्री क्षेत्र देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे मधुकर महाराज मोरे, विशाल मोरे, सासवड येथील श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, श्रीकांत गोसावी, मनोज रणवरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला.
आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्हणूनही ओळखली जाते. या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ही यात्रा बुधवार 1 जुलै, 2020 रोजी भरणार आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा करणार आहेत. आषाढी यात्रा कालावधी हा आषाढ शुद्ध 1 (दिनांक 22 जून 2020) ते आषाढ शुद्ध 15 (दिनांक 5 जुलै 2020) असा राहणार आहे.
सध्या जगभरामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले आहे. पुण्यामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत या भागातून पंढरपूरमध्ये वारकरी पायी चालत येणे हे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पंढरपूरमध्ये संसर्गाचा मोठा धोका निर्माण करणारे ठरु शकते. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक एकत्र आल्यास सामूहिक संसर्गाचा धोका आहे.
संसर्ग झालेले भाविक, वारकरी त्यांच्या भागामध्ये परत गेल्यानंतर त्या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त बुक्का विक्री, मूर्ती विक्रेते, हार-फूल विक्रेते, तंबोरे, टाळ,वीणा व फोटो विक्रेते यांच्यासारखे अनेक लहान-मोठे व्यावसायिक यात्रा काळात पंढरपूरमध्ये येत असतात. या जनसमुदायांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे शक्य होणार नाही. तसेच सध्या पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यामध्ये व्यस्त आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोनाचे संकट नसते तर प्रदीर्घ परंपरा असलेला हा आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीच्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला असता. या पालखी सोहळ्याबाबतची माहिती.
पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरकडे शासनामार्फत सोपवण्यात आलेला आहे. या अधिनियमानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आलेले आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील ३६ परिवार देवता तसेच पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे. या सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा इत्यादी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. लाखो वारकऱ्यांच्या श्रध्देचे स्थान व उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगना या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात. या यात्रा कालावधीत अंदाजे १५ लाख भाविक पंढरपूर दर्शनासाठी येतात.
आषाढी यात्रेचे महत्व
आषाढी यात्रा ही पंढरीतील ‘महायात्रा’ म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. भगवंत या एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. चातुर्मासात भक्त अधिकाधिक विठ्ठल गुणांचे, रुपाचे श्रवण-कीर्तन करुन विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात.
"आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।"
आषाढी कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालू असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कोनाकोपऱ्यातून पंढरीकडे श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंडया एकमेकांना भेटतात. इथून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळूहळू पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संताच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपूर येथे सर्व दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सर्वांना गोपाळकाला वाटला जातो व सर्व दिंड्या व पालख्या परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात आणि यात्रेची सांगता होते.
आषाढी वारीचे नियोजन
दर्शनरांग नियोजन
श्रीच्या मुख व पदस्पर्शदर्शन रांगेत बॅरीकेटींग करणे, मॅटींग टाकणे, पत्राशेड व उड्डाणपूल उभारणे, भाविक काऊन्टींग मशिन उभारणे इत्यादी व इतर अनुषंगिक कामे केली जातात.
दर्शन व्यवस्था
श्रीचे २४ तास दर्शन उपलब्ध करून देणे, लाईव्ह दर्शन देण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल अॅप, एलईडी स्क्रीन इत्यादीची व्यवस्था करणे, व्हिआयपी व ऑनलाईन बुकींग दर्शन व्यवस्था बंद करणे व इतर अनुषंगिक व्यवस्था केली जाते. वैद्यकीय सुविधा - मोफत वैद्यकीय व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेणे, प्रथमोपचार पेट्या ठेवणे, रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे.
आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था
रेस्क्यू व्हॅन, सिझफायर, अग्निशामक, चंद्रभागा नदीपात्रात जीवरक्षक नियुक्त करणे, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, वायरलेस स्कॅनर मशिन, खाजगी सुरक्षा व्यवस्था व इतर अनुषंगिक व्यवस्था करणे. निवास व्यवस्था - समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन, एमटीडीसी, श्रीविठल रुक्मिणी इ. भक्तनिवास येथील सर्व रूम्स व डॉरमेटरी भाविकांना व यात्रा कालावधीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना उपलब्ध करून देणे. विमा पॉलिसी- भाविकांसाठी अपघात विमा पॉलिसी उपलब्ध करून देणे. दर्शनरांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, भोजन, चहा, फराळ भाविकांना मोफत वाटप करणे. भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून राजगिरा व बुंदी लाडूप्रसाद तसेच श्रीचे फोटो अल्पदरात उपलब्ध करून देणे. देणगी व्यवस्थेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देणे. स्वच्छता व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे. चंद्रभागा नदीपात्रात महिला भाविकांना चेंजिंग रूम उपलब्ध करून देणे.
भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमित कर्मचाऱ्या व्यतिरिक्त रोजंदारी कर्मचारी नियुक्त करणे तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे. मंदिरात फुलांची आरास व लाईटींग डेकोरेशन करणे या सारख्या कामांचे नियोजन करण्यास सुरुवात झाली असती.
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या मानाच्या पालख्या
1) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि. पुणे.
2) श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली, जि. पुणे.
3) श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड, ता. पंढरपूर, जि. पुणे.
4) श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
5) श्री संत मुक्ताबाई देवस्थान, मुक्ताईनगर, जि. जळगांव.
6) श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
7) श्री संत नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर.
श्री संत गजानन महाराज संस्थान, श्रीक्षेत्र शेगांव, जि. बुलढाणा आणि श्री संत निळोबाराय महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पिंपळनेर, जि. अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील इतर अंदाजे १४० विविध संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी येत असतात.
आषाढी यात्रा कालावधीत श्रीचे दर्शन 24 तास असते. याच कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्री पांडुरंगास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्या दिला जातो. आषाढी वद्य पंचमी किंवा षष्ठीला चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रीची प्रक्षाळपूजा आयोजित केली जाते. 24 तास दर्शन कालावधीत नित्यपूजा, महानैवेद्य, लिंबूपाणी हे नित्योपचार असतात. मुखदर्शन नामदेव पायरीकडून 24 तास चालू असते.
आषाढी यात्रा कालावधीत मंदिरात येणाऱ्या पालख्यांची माहिती
आषाढ शु. पौर्णिमेला आषाढी यात्रेची सांगता होते. या दिवशी (दि.०५/०७/२०२०) स. ६.०० वाजता श्री संत एकनाथ महाराजांची दिंडी काला करण्यासाठी मंदिरात येते. त्यानंतर निवृत्तीनाथ, श्री संत सोपान काका, श्री संत मुक्ताबाई, श्री विठ्ठल रूक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज या पालख्या मंदिरामध्ये येतात. त्या सर्वांचा यथोचित सत्कार मंदिर समितीमार्फत करण्यात येतो. त्याचप्रमाणे श्री विठ्ठलास संतांच्या भेटी झाल्यावर पालखी समवेत असलेल्या सर्व भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी सोडण्यात येते.
तसेच आषाढ शु. पौर्णिमेला श्री विठ्ठलाच्या पादुकांची विधिवत षोडशोपचार पूजा करून पादुका श्री विठ्ठलाच्या चरणास स्पर्श करून त्याची पूजा करून पालखीमध्ये ठेवून त्याची सवाद्य मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने काढण्यात येते व परत पादुका मंदिरात आल्यावर श्री विठ्ठलाच्या पादुकांना स्पर्श करून श्री रूक्मिणी मातेची भेट घडविण्यात येते. त्यानंतर पादुका थोडा वेळ श्री महालक्ष्मी मंदिरात ठेवून या पादुका परत कार्यालयात आणण्यात येतात.
आषाढ वद्य ५ (दि.१०/०७/२०२०) ते कार्तिक शुध्द ५ (दि.१९/११/२०२०) या कालावधीमध्ये चार्तुमास असतो. आषाढी वद्य १ या दिवशी महाद्वार काल्याने आषाढी यात्रेची सांगता होते.
पालखी सोहळ्याची माहिती-
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी, ता.खेड, जि पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१३/०६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १७ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्हयात ७, सातारा जिल्हयात ४ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १२ ठिकाणी विसावे आहेत. या पालखी सोहळयाची उभे/ गोल रिंगण ७ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमा पर्यंत (दि.०५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीच्या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि. पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो.श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा
हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र सासवड, जि. पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१८/०६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे आणि सोलापूर अशा दोन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १२ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ११ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.०५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची रिंगण २ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड, ता. सासवड, जिल्हा पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा
हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि. ६/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात २३ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६, अहमदनगर जिल्हयात ११ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे २५ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीच्या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची गोल रिंगण २ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक यांच्यामार्फत संचलित केला जातो.
श्री संत मुक्ताई पालखी सोहळा
हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर, जि. जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.२४/५/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा सहा जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात ३३ ठिकाणी मुक्काम करतो.
यामध्ये जळगाव जिल्हयात ६, बुलढाणा जिल्हयात ८, जालना जिल्हयात ५, बीड जिल्हयात ७, उस्मानाबाद जिल्हयात ३ आणि सोलापूर जिल्हयात ४ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ३३ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. त्यानंतर परतीच्या प्रवासास निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर, जि. जळगांव यांच्या मार्फत संचलित केला जातो.
श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा
हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पैठण, जि. औरंगाबाद ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१२/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा पाच जिल्हयातून जातो. पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १८ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये औरंगाबाद जिल्हयात ४, बीड जिल्हयात ४, अहमदनगर जिल्हयात ३, उस्मानाबाद जिल्हयात १ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १३ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवास निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद यांच्यामार्फत संचलित केला जातो.
श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा
या पालखी सोहळयाचे मुख्य ठिकाण श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर आहे. हा पालखी सोहळा श्री संत नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर यांच्यामार्फत संचलित केला जातो.
श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा
हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र शेगांव, जि. बुलढाणा ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.२८/५/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र शेगांव ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा आठ जिल्ह्यातून जातो.
हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात ३२ टिकाणी मुक्काम करतो. यामध्ये अकोला जिल्ह्यात ६, वाशिम जिल्हयात ४, हिंगोली जिल्हयात २, परभणी जिल्हयात ५, बीड जिल्हयात ३, उस्मानाबाद जिल्हयात ६ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ३० ठिकाणी विसावे आहेत. हा सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवास
complete information about Ashadi Wari Palkhi ceremony pandharpur wari 2020, ashadhi vari information in marathi, how is the vari planned, ashadhi vari 2020, in which month do the varkaris go on the vari, dehu to pandharpur palkhi route
Labels
Lifestyle
Post A Comment
No comments :