technology

[Technology][bleft]

Health

[Healthcare][bleft]

Business

[Business][bleft]

Network Marketing

[Network Marketing][bleft]

‘मनसंवाद’: मोफत समुपदेशनातून मानसिक आधार

‘मनसंवाद’: मोफत समुपदेशनातून मानसिक आधार
प्रातिनिधिक चित्र

कोरोना विषाणूच्‍या त्रासामुळे जिल्‍हा, राज्‍य, देश नव्‍हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्‍यांना एकांताची सवय आहे, त्‍यांना इतका त्रास होणार नाही, पण अनेकांना या अस्थिर वातावरणाचा मानसिक त्रास होवू शकतो.

या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे अनेक मानसशास्‍त्रज्ञ, समुपदेशक या क्षेत्रात काम करणा-या संस्‍था स्‍वत:हून पुढे आल्‍या आहेत.  मानसिक तणावाला सामोरे जाणा-या व्‍यक्‍तींना मोफत ऑनलाईन समुपदेशन करुन ते धीर देत आहेत.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्‍याला समुहात राहण्‍याची आवड आहे. सध्‍याच्‍या वातावरणामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत, त्‍यामुळे अनेकांच्‍या मनात नकारात्‍मक विचार येतात.

विद्यार्थी, नोकरदार महिला, गृहिणी, तरुण, ज्‍येष्‍ठ नागरिक यांना वयोमानाप्रमाणे, परिस्थितीनुसार कमी-अधिक प्रमाणात नैराश्‍य येवू शकते. यावर कशी मात करता येईल, यासाठी वर्तमानपत्रातून, प्रसारमाध्‍यमांतून, सोशल माध्‍यमातून माहिती देणारे लेख, संदेश, व्हिडीओ प्रसारित करण्‍यात येत आहेत.

काही समुपदेशकांनी ठराविक वेळेत दूरध्‍वनीवरुन, सोशल मिडीयावरुन लोकांशी संवाद साधून कौतुकास्‍पद उपक्रम सुरु केला आहे.  निराशेच्‍या  वाटेवरील या व्‍यक्‍तींना सकारात्‍मक वाटेवर आणण्‍याचा हा उपक्रम गौरवास्‍पद आहे.

नागरिकांना अन्‍न–धान्‍य, दूध, भाजीपाला, औषधी  या जीवनावश्यक वस्तू जरी सहजतेने मिळत असल्या तरी ‘कोरोना’चा कहर आणखी किती दिवस राहील, याबाबत निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. यामुळे नागरिकांमध्‍ये निराशेचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी आरोग्‍य यंत्रणेनेही पुढाकार घेतला आहे.


समुपदेशन राज्यातील पहिला उपक्रम- देशात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्‍यानंतर खबरदारी म्‍हणून पुणे जिल्‍हा प्रशासनाने आवश्‍यक ते उपाय योजण्‍यास सुरुवात केली होती. त्याबाबत 27 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्‍यात आली. त्‍यानंतर 4 मार्च रोजी आणि 6 मार्च रोजी व्‍यापक बैठक घेवून कोरोना प्रादुर्भाव झाल्यास जिल्‍हा प्रशासन या आव्‍हानास तोंड देण्‍यासाठी सज्‍ज असल्याचे जाहीर करण्‍यात आले.

जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेळोवेळी विविध यंत्रणांच्‍या सज्‍जतेचा आढावा घेतला.

पुणे शहरात ‘कोरोना’बाधित व्‍यक्‍ती 9 मार्चला आढळून आल्यानंतर सर्व संभाव्‍य परिस्थिती लक्षात घेवून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरु केली. याचाच एक भाग म्‍हणून जिल्ह्यातील नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्याची यंत्रणाही कार्यान्वित केली.

‘मनसंवाद’  - महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व मनोविकृती शास्त्र विभागातर्फे ‘मनसंवाद’  हेल्पलाईन क्र. ०२०-२६१२७३३१ ही सर्व सामान्यांसाठी सेवा सुरु करण्यात आली.  याचा रोज सरासरी 25 लोक लाभ घेत आहेत. तसेच कोरोना संदर्भातील सर्व शंकाचे निरसन करण्यासाठीही २४ तासांसाठी हेल्पलाईन (क्र. ०२०-१८००२३३४१२० व ०२०-२६१०२५५०) सुरु करण्यात आली. समाजप्रबोधनासाठी वेगवेगळया प्रकारच्‍या मार्गदर्शक पुस्तिका, भित्तीपत्रके तयार करुन वाटण्यात आली.


कर्वे समाज सेवा संस्था येथे मानसिक आरोग्यावरील केंद्र चालविले जाते. येथूनही ऑनलाइन समुपदेशन केंद्र चालविण्यात येत आहे. कर्वे संस्थेचे मानसोपचारतज्ज्ञ मोबाईलवरुन किंवा ऑनलाइन मोफत समुपदेशन करीत असून ते ई -मेलवरही नागरिकांशी संपर्क करीत आहेत.

उपक्रमाचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांच्यासह डॉ. संजय कुमावत, डॉ प्रवीण पारगावकर, डॉ. कल्याणी तळवलकर, डॉ. स्नेहा मुलचंदानी हेही लोकांचे समुपदेशन करीत आहेत.

याबरोबरच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राकडूनही मोफत समुपदेशन सेवा देण्‍यात येत आहे. केतकी कुलकर्णी, विशाखा जोगदेव, सुरेखा नंदे, गिरिजा लिखिते हे समुपदेशक नागरिकांशी संवाद साधत आहेत.

या शिवाय अनुभूती संस्‍थेच्‍या प्राजक्‍ता अमोल गाडेकर यांच्‍यासारखे अनेक समुपदेशक वैयक्तिक स्‍तरावरुनही  फोनवरुन संवाद साधून नागरिकांचा मानसिक तणाव दूर करण्‍यास मदत करत आहेत. बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे. या साठी विविध समुपदेशक, संस्‍था स्‍वयंस्‍फूर्तीने पुढाकार घेवून समाजसेवा करत आहे, हे आनंददायी आणि कौतुकास्‍पद आहे.

राजेंद्र सरग,
जिल्‍हा माहिती अधिकारी,
पुणे

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Cryptocurrency News

[Cryptocurrency][grids]

Current Affairs

[Current Affairs][bleft]

Climate change

[Climate Change][twocolumns]

Lifestyle

[Lifestyle][twocolumns]